प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: नुकत्याच पार पडलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, शरद पवार गटाने पुन्हा एकदा एकत्र येण्याची साद घातली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्यासोबत येण्याचे मोठे आवाहन केले आहे.
"अजित पवारांचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अजित दादांच्या पक्षाने आमच्या सोबत यावे," असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, आपण अजितदादांच्या कुटुंबावर कधीही टीका केली नसून त्यांना अपमानास्पद वाटेल असे कोणतेही कृत्य केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी आपण कुणासोबतही जाणार नाही, तर हवं असेल त्यांनीच आपल्यासोबत यावे अशी भूमिका मांडत विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, सोमेश्वर कारखान्यातील प्रतिष्ठेच्या लढतीनंतर पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये थेट लढत झाली. युगेंद्र पवार यांच्या पॅनलकडे शरद पवारांचे पॅनल म्हणून पाहिले जात होते. या लढतीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने सर्व २१ जागा जिंकत बाजी मारली आणि शरद पवारांचे मार्गदर्शन लाभलेल्या पॅनलचा दारुण पराभव झाला.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याचे वारंवार दावे करण्यात आले होते. पण अजितदादांच्या निधनानंतर या चर्चा मागे पडल्या. त्यांच्या निधनानंतर दोन्ही गट एकत्र येणार का, यावर अनेक वक्तव्ये झाली. मात्र, दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाच्या मनात एकत्र येण्याची इच्छा नसल्याचे त्यातून स्पष्ट झाले होते.
काही महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या, पण त्या केवळ चर्चाच ठरल्या. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन गट पडले. सध्या एक गट केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत आहे, तर दुसरा गट शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षात काम करत आहे.





