प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: 'श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पॅनेल'ने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१-० अशा फरकाने निर्विवाद विजय मिळवला आहे. या यशानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, हे यश दादांनी गेली ३४ वर्षे घेतलेल्या कष्टांचे फळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे आणि शेवटचा शेतकरी सुखी झाला पाहिजे, अशी दादांची नेहमीच भावना असते. याच अनुषंगाने यावर्षी साखर कारखान्याने देशातील उच्चांकी भाव दिल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. दादा नेहमीच जिंकण्यासाठी निवडणुका लढायचे, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्या म्हणाल्या की, सध्या अनेक ठिकाणी भयानक दुष्काळ असून आपण स्वतः काही भागांची पाहणी केली आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठकही पार पडली असून, शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. सध्या सरकार आणि केंद्राचे पथक राज्यात नुकसानीची तपासणी करत आहे.
केंद्राची टीम पाहणी करत असली तरी राज्याची टीमही मदतीला उपलब्ध असून मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या पदवीधर निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी यावर नंतर बोलण्याचे स्पष्ट केले. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अशीच चमकदार कामगिरी करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.





