‘पप्पा मला वाचवा…’, लेकाच्या अखेरच्या शब्दांनी शेखर सुमन भावूक; व्यक्त केली हतबलता

प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी आपला ११ वर्षांचा दिवंगत मुलगा आयुष याच्या निधनाची आणि त्यावेळच्या संघर्षाची अत्यंत भावूक आठवण सांगितली आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांच्या आयुष्यात एक अशी पोकळी आहे, जी अफाट यश आणि पैसा मिळवूनही भरून निघालेली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला ११ वर्षांचा मुलगा आयुष याच्या निधनाची आठवण सांगताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मृत्यूशी झुंजताना मुलाने मारलेली 'पप्पा, मला वाचवा' ही आर्त हाक आजही त्यांच्या मनाला चटका लावून जाते.

शेखर आणि त्यांच्या पत्नी अलका सुमन यांचा मोठा मुलगा आयुष याला हृदयाचा एक दुर्मीळ आजार जडला होता. डॉक्टरांनी तो अवघे काही महिनेच जगेल असे सांगितले होते, मात्र त्याने आजाराशी मोठा लढा दिला. मुलाचे प्राण वाचवण्यासाठी शेखर यांनी देश-विदेशातील डॉक्टरांचे उंबरठे झिजवले. पण सर्व प्रयत्नांनंतरही नियतीपुढे त्यांचे काहीच चालले नाही आणि १९९५ मध्ये आयुषने या जगाचा निरोप घेतला.

या अत्यंत कठीण काळाची आठवण सांगताना शेखर सुमन म्हणाले की, सुरुवातीला त्यांच्याकडे काम नव्हते आणि मुलाच्या उपचारांसाठी ते पुरेसे पैसेही कमवत नव्हते. आतून पूर्णपणे खचलेले असतानाच त्यांना 'देख भाई देख' या मालिकेची ऑफर मिळाली. अशा मनस्थितीतही आपण हे काम कसे केले, हे आजही त्यांना समजत नाही.

मुलाच्या प्रकृतीची वेळोवेळी माहिती मिळण्यासाठी मालिकेच्या सेटवर त्यांच्यासाठी खास एका टेलिफोनची व्यवस्था करण्यात आली होती. तो फोन वाजला की, कोणती वाईट बातमी तर नाही ना, या भीतीने त्यांच्या हृदयाची धडधड वाढायची. फोनवरील माहिती घेतल्यानंतर त्यांना पुन्हा कॅमेरासमोर जाऊन विनोदी भूमिका साकारावी लागायची, जो त्यांच्यासाठी मोठा संघर्ष होता.

आयुषच्या शेवटच्या दिवसांतील वेदना आणि स्वतःची हतबलता व्यक्त करताना शेखर सुमन खूप भावूक झाले. ते म्हणाले, "एके दिवशी त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, 'बाबा.. मला जायचं नाहीये. कृपया वाचवा.' त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्याने आपण त्यांच्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. तो एका देवदूतासारखा होता." मुलाला वाचवू न शकल्याची ही सल शेखर सुमन यांच्या मनात कायम आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या