प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे अभिनयासोबतच उत्तम स्वयंपाक करण्यात आणि आपुलकीने जेवण वाढण्यातही निष्णात आहेत. आपण जर अभिनय क्षेत्रात आलो नसतो, तर नक्कीच कुक झालो असतो, असे नाना पाटेकर यांनी अनेक मुलाखतींमध्ये स्वतः नमूद केले होते.
नाना पाटेकर यांना चिकन खिमा, पाया सूप आणि विशेषतः मटण ग्रेव्ही मसाला हे मांसाहारी पदार्थ अतिशय आवडतात. या पदार्थांसाठी ते स्वतः खडे मसाले तयार करतात.
नानांच्या पद्धतीनुसार १ किलो मटण बनवण्यासाठी १ किलो मटण, २ मोठे बारीक चिरलेले कांदे, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, २-३ हिरव्या मिरच्या, २ बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धा कप दही, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल तिखट, २-३ तेजपत्ता, दालचिनीचा एक तुकडा, ३-४ मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ लागते. तसेच खास मटण मसाल्यासाठी १ चमचा जिरे, १ चमचा धणे, ५-६ काळी मिरी, ३-४ लवंगा, २ हिरवी वेलची, १ लहान दालचिनीची काडी आणि १-२ सुक्या लाल मिरच्या आवश्यक असतात.
मसाला तयार करताना सर्व खडे मसाले हलके भाजून खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर बारीक करावेत; मसाले अतिबारीक झाल्यास पदार्थाची चव बिघडू शकते. त्यानंतर पॅन, कढई किंवा प्रेशर कुकरमध्ये तेलात तेजपत्ता आणि दालचिनी सोनेरी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावी. त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकून काही मिनिटे परतावे.
पुढील कृतीत मटणाचे तुकडे मोठ्या आचेवर भाजून घ्यावेत. त्यात हळद, लाल तिखट, मीठ आणि फेटलेले दही घालून मसाले एकजीव होईपर्यंत सतत ढवळावे. त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो व तयार मसाला घालून तेल वेगळे होईपर्यंत मंद आचेवर शिजवून आवश्यकतेनुसार गरम पाणी घालावे. कढईत अधूनमधून ढवळून अथवा कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या काढून मटण पूर्ण शिजवावे आणि शेवटी कोथिंबीर घालून सजवावे.





