प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: खराब फॉर्ममुळे भारतीय संघ आणि यंदाच्या रणजी करंडकासाठी मुंबईच्या टीममधून बाहेर असलेला सूर्यकुमार यादव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सूर्याने थेट दुबईत एक नवीन प्रॉपर्टी खरेदी केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही गुडन्यूज सर्वांसोबत शेअर केली आहे.
टीम इंडियाच्या या माजी टी-२० कर्णधाराने डॅन्यूब प्रॉपर्टीजकडून हे घर खरेदी केले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या इमारतीचे काम सुरू आहे, त्याच परिसरात सूर्याने गुंतवणूक केली आहे. शाहरुखच्या इमारतीचे बांधकामही डॅन्यूब प्रॉपर्टीजच करत आहे. हे नवे घर दुबईतील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या 'मॅरिटाइम सिटी' या आलिशान परिसराच्या अगदी मध्यभागी आहे. या अपार्टमेंटमधील फ्लॅटची किंमत ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे.
या नव्या घरात ४० हून अधिक आलिशान सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांमध्ये 'लॉन्जेविटी लाउंज' या भागाने सूर्यकुमारचे मन जिंकले आहे. त्याच्या मते, निवासी प्रकल्पांमध्ये अशा प्रकारच्या सुविधा सहजासहजी पाहायला मिळत नाहीत.
दुबईत घर घेण्यामागचे कारण सांगताना सूर्याने स्पष्ट केले की, २०१४ मध्ये आयपीएलच्या निमित्ताने तो पहिल्यांदा दुबईत गेला होता. त्यानंतर २०२० मध्ये त्याने पुन्हा तिथे भेट दिली. सध्या भारतातील अनेक लोक दुबईत येत असल्याचे तो म्हणाला. या गुंतवणुकीबाबत बोलताना सूर्या म्हणाला, "येथील जीवन पूर्णपणे वेगळे आणि आलिशान आहे. सुरक्षा हीही एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थात मी जिथे राहतो मुंबईत तिथे ही सुरक्षा उपलब्ध आहे. दुबईत जेव्हा मी येतो तेव्हा मला खूप आनंद होतो."





