प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: प्रसिद्ध कॉमेडियन सुदेश लहरी आज सुखासीन आयुष्य जगत असले तरी, त्यांच्या यशामागे एका अनोळखी महिलेचा आशीर्वाद आहे. एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलेल्या सुदेश यांनी तिथे एका कोपऱ्यात जखमी अवस्थेत असलेल्या एका महिलेला पाहिले. त्यांनी त्या महिलेला स्वतःच्या घरी आणले, तिला आई मानले आणि तिची सेवा केली. याच महिलेने अखेरचा श्वास घेताना दिलेल्या आशीर्वादामुळे सुदेश यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
या भावुक घटनेचा खुलासा सुदेश यांनी स्वतः कधीच कोणत्याही मुलाखतीत केला नाही. मात्र, 'लाफ्टर शेफ्स' या कार्यक्रमाच्या सेटवर कृष्णा अभिषेकने ही आठवण सांगितली. कृष्णाने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूसमयी त्या महिलेने सुदेश यांना 'तुझं कधीच वाईट होणार नाही, तू यशाच्या उच्च शिखरावर पोहोचशील' असा आशीर्वाद दिला होता. त्यानंतर सुदेश यांना मुंबईतून एक फोन आला आणि त्यांच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली.
आज महागड्या गाड्या आणि आलिशान बंगल्याचे मालक असलेल्या सुदेश यांनी एकेकाळी प्रचंड गरिबीचा सामना केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या संघर्षाचा खुलासा केला होता. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांनी फॅक्टरी आणि छोट्या दुकानांमध्ये काम केले. पायात चप्पल नसताना ते चहाच्या दुकानात काम करायचे आणि कंपन्यांमध्ये चहा पोहोचवताना स्वतःसाठी एका रिकाम्या कपात थोडासा चहा काढून ठेवायचे.
त्यावेळी घरात चहा बनवण्यासाठीही पैसे नसायचे, अशी ती बिकट परिस्थिती होती. कुटुंबाला जेवण देण्यासाठी सुदेश यांना स्वतः जिंकलेली एक ट्रॉफी अवघ्या ३०० ते ४०० रुपयांना विकावी लागली होती. मात्र, या अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत सुदेश लहरी यांनी आज आनंदी आणि सुखकर आयुष्य मिळवले आहे.





