सांगली, 14 ऑक्टोबर: राज्यात आगामी ऊस गाळप हंगामावर मोठे संकट उभे राहिले आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ऊस दर आंदोलनानंतर आता साखर कारखान्यांमधील कामगारांनीही आरपारच्या लढ्याची तयारी केली आहे. प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील साखर कामगार २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती ‘महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळा’चे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.
सांगलीतील ऐतिहासिक वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात कामगारांचा एक महत्त्वाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ‘महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ’ या दोन प्रमुख संघटनांनी एकत्र येत या बेमुदत संपाची संयुक्त हाक दिली. राज्य सरकार आणि कारखाना प्रशासनाकडून कामगारांच्या रास्त मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी कामगार नेत्यांनी केला.
रद्द करण्यात आलेला ‘महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम १९४७’ पूर्ववत लागू करावा, बंद पडलेले कारखाने सुरू करून कामगारांचे पुनर्वसन करावे, थकीत वेतन तातडीने द्यावे आणि साखरेला योग्य हमीभाव देऊन वेतनाचा प्रश्न सोडवावा, अशा कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या पार्श्वभूमीवर तात्यासाहेब काळे यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, "जोपर्यंत सर्व मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत, तोपर्यंत २२ ऑक्टोबरपासून राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही." एकीकडे ऊस दरासाठी आक्रमक झालेल्या शेतकरी संघटना आणि दुसरीकडे कामगारांचा संप, यामुळे यंदाचा गाळप हंगाम वेळेत सुरू होण्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.





