‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा थेट सवाल

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत जय पवार यांनी प्रचारादरम्यान विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर जोरदार टीका करत विविध सवाल उपस्थित केले आहेत.

Jay Pawar addressing farmers during Someshwar Sugar Factory Election campaign

प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत ‘सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जय पवार यांनी सोमवारी सोमेश्वर परिसरात झंझावाती दौरा केला. पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे आयोजित सभेत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत विरोधकांवर जोरदार टीका केली.

कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा साधताना जय पवार म्हणाले की, २८ तारखेला सर्वांनी एकत्र बसून एकच पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चेअरमननी येऊन १६ विशिष्ट उमेदवारांचीच मागणी केली. यावर ‘तुमची इतकी माणसं घेतल्यास बाकीच्या उमेदवारांना कसं बसवायचं?’ असा सवाल वहिनींनी केला होता. “दादा असते, तर तुम्ही अशी यादी दिली असती का? दादांनी एखादं नाव पॅनलमध्ये हवं असं ठरवलं असतं, तर तुम्ही त्यांना नको म्हणाला असता का?” असा थेट प्रश्न जय पवार यांनी उपस्थित केला. तसेच, दादांना बोलावल्यास वहिनींना साडेतीन ते चार तास वाट बघायला लावली, असा आरोपही त्यांनी केला.

कारखान्याच्या कामकाजाबाबत बोलताना जय पवार यांनी सांगितले की, आपणही दादांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चालवतो, तिथे योग्य उत्तर न दिल्यास दादांचे फटके खावे लागतात. आज दादांचा फोटो पाहून मन भरून येत असल्याचे सांगत, “पार्थ दादा आणि आम्ही जरा मोठे असतो तर आणखी जोमाने काम करू शकलो असतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच शिवतारे बापू यांनीही आपल्यासोबत असल्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती केली आहे. तर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शेतकरी विकास पॅनेल’ रिंगणात आहे. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्यावर बंडखोरी करत स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने ही निवडणूक अत्यंत रंगतदार वळणावर आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या