‘अजित नसल्याने आता मीच लक्ष घालणार’, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांचा शब्द; युगेंद्र पवारांचा भाजपवरही निशाणा

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’चा प्रचार सुरू झाला असून, अजितदादा नसल्याने आता मीच लक्ष घालणार असल्याचा शरद पवारांचा निरोप युगेंद्र पवारांनी दिला.

Yugendra Pawar launches Someshwar Shetkari Vikas Panel campaign for cooperative sugar factory election.

बारामती, 4 ऑक्टोबर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी थेट शरद पवार यांचा निरोप सभासदांपर्यंत पोहोचवला. ‘जोपर्यंत दादा होते तोपर्यंत गोष्ट वेगळी होती, मी खाली लक्ष घालत नव्हतो. पण आता दुर्दैवाने अजित नाही, त्यामुळे हा कारखाना सभासदांचाच राहावा यासाठी मी स्वतः यात लक्ष घालणार आहे,’ असा शब्द शरद पवार यांनी दिल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, आपले सर्व उमेदवार सामान्य आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे मोठ्या गाड्या नाहीत किंवा गाडीवर ‘५५५५’ असा नंबर दिसणार नाही, पण ते कारखाना उत्तम पद्धतीने सांभाळू शकतात. कारखान्यात अनेक उपपदार्थ तयार होऊ शकतात, ज्यातून सभासदांना अधिकचा दर मिळू शकतो. तसेच कारखान्याच्या कामात पारदर्शकता असली पाहिजे आणि कामगार वशिल्यावर न भरता मेरीटवर घेतले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. शरद पवार यांच्या धोरणानुसार पॅनलमध्ये तीन महिलांना उमेदवारी देण्यात आली असून, दुसऱ्या पॅनलने केवळ दोनच महिलांना संधी दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच शेजारील खंडोबाची वाडीत १५ वर्षे एकच उमेदवार असताना, यंदा आम्ही बदल करत पहिल्यांदाच गरदडवाडी गावाला संचालक पदासाठी संधी दिली आहे.

राजकीय विरोधकांवर निशाणा साधताना युगेंद्र पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. ‘इथे म्हणजे बारामतीत भाजप मागच्या दराने येण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या साहेबांची सत्ता नसली तरी ते एवढे मोठे नेते आहेत की सत्ता असो वा नसो आपली कामे होतातच. देशाचे पंतप्रधान ३ नोव्हेंबरला बारामतीत येत आहेत आणि ते साहेबांना गुरू मानतात. त्यामुळे आपली जी कामे असतील ती साहेब त्यांना सांगतील आणि कामे होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उमेदवारांची ओळख करून देताना एका कार्यकर्त्याने ‘दादा लव्ह यू’ अशी हाक मारली. त्यावर हसून, ‘मी तुम्हाला लव्ह यू टू म्हणालो असतो, पण अलीकडील काळात हे जरा जास्तच झालंय,’ असे युगेंद्र पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

निवडणुकीच्या चिन्हांवरूनही युगेंद्र पवार यांनी टोलेबाजी केली. आपल्या पॅनलचे चिन्ह ‘किटली’ असून किटलीशिवाय कपबशी भरत नसल्याचे ते म्हणाले. तर विरोधकांचे चिन्ह ‘शिट्टी’ हे सावध करण्यासाठी वाजवले जाते, त्यामुळे भाजप इथे आल्याची जाणीव ठेवून सभासदांना सावध करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपण ८० हून अधिक गावांचे दौरे केले असून लोकांच्या मते शरद पवारांशिवाय दुसरा पर्याय नाही. आमचे पॅनल निवडून आल्यास आठवड्यातील एक दिवस मी कारखान्याला देईन. तिथे बसून राहीन आणि वेळ पडल्यास साहेबांचे मार्गदर्शन घेऊन कारखाना चांगला चालवून दाखवेन, अशी ग्वाही युगेंद्र पवार यांनी दिली. तसेच, विरोधक चिखलफेक करतील, पण आपण शिव्या न देता सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रचार करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या