प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. यात पुण्यातील दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला आल्या असल्या तरी, शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले आहे की, “पुणे मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे, मंगेश चिवटे हे आमचे उमेदवार असतील, ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, भाजपाचा उमेदवार देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करेल. परंतु शेवटचा निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घेतील.” मंगळवारी मंगेश चिवटे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या जागावाटपात पुणे मतदारसंघातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा भाजपकडे गेल्या आहेत. अमरावतीची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करणार आहे. पुण्यातील शिक्षक मतदारसंघासाठी सुरुवातीपासूनच मंगेश चिवटे इच्छुक होते. मात्र, ही जागा भाजपला गेल्याने या मतदारसंघातून त्यांचा पत्ता कट झाला होता.
उमेदवारी मिळाली नसली तरी चिवटे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच चिवटे यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते, त्यावर आता सामंत यांच्या घोषणेमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. चिवटे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्यास या बंडखोरीचा मोठा फटका भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे ही बंडखोरी मोडून काढण्याचे मोठे आव्हान आता पक्षासमोर असणार आहे.







