पुणे, 4 ऑक्टोबर: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर घेण्यात आला आहे. या जागेवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती.
या जागेसाठी अनेक जण इच्छुक असून मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय आणि माजी ओएसडी सचिन सानप यांनी निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका घेतली आहे. सानप हे पुण्यातील वाडिया महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असून, तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले. तसेच, शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे देखील या जागेसाठी इच्छुक आहेत.
विधान परिषदेच्या विविध जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांचे मतदारसंघनिहाय जागावाटप निश्चित झाले आहे. यानुसार पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर या तिन्ही जागा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वाट्याला आल्या आहेत. तर अमरावतीची जागा शिवसेना (शिंदे गट) आणि छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मिळाली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला मिळताच पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची यादी सुपूर्द केली आहे. भाजपने प्रत्येक जागेसाठी ५ संभाव्य उमेदवारांचे पर्याय ठेवले असून, ३ मतदारसंघांसाठी एकूण १५ नावे केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहेत. यामध्ये पुण्याच्या जागेवरील प्रमुख दावेदारांचाही समावेश असून, लवकरच केंद्रीय निवडणूक समितीकडून अधिकृत उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.







