विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ; बँकांची ८,७५१ कोटींची अद्याप थकबाकी, ईडीनेही स्पष्ट केली भूमिका

फरार उद्योगपती विजय मल्ल्याकडून अद्याप ८ हजार ७५१ कोटी रुपये वसूल करणे बाकी असल्याचे बँकांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

Vijay Mallya money laundering case ED and SBI bank recovery

प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: मनी लाँड्रिंग प्रकरणात भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya) याच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. मल्ल्याकडून ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अंदाजे ८ हजार ७५१.८६ कोटी रुपये वसूल करणे बाकी असल्याची महत्त्वपूर्ण माहिती एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. या थकबाकीच्या रकमेमध्ये कायदेशीर आणि इतर खर्चांचा समावेश नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्ज वसुली अधिकाऱ्यामार्फत आतापर्यंत १० हजार २७० कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम वसूल करण्यात आली आहे. याशिवाय खटला दाखल होण्यापूर्वी ५४४.५८ कोटी रुपये वसूल झाले होते. जानेवारी २०२६ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मल्ल्याकडे ८ हजार १३५.६३ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यात व्याज आणि इतर देयतांची भर पडल्याने ३१ ऑगस्टपर्यंत ही रक्कम ८ हजार ७५१.८६ कोटींवर पोहोचली आहे.

बँकांनी आपल्या थकबाकीपेक्षा जास्त रक्कम वसूल केली असून हा वाद आता मिटला असल्याचा दावा करत मल्ल्याने २०२० मध्ये फौजदारी खटले रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, बँकांनी आपल्या अलीकडील प्रतिज्ञापत्रात मल्ल्याचा हा दावा फेटाळून लावला आहे. या प्रकरणात जप्त केलेले काही शेअर्स अद्याप विकले गेले नसल्याने वसुलीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे बँकांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाला माहिती दिली की, एसबीआयच्या नेतृत्वाखालील समूहाला आतापर्यंत सुमारे १४ हजार १३१.६ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता परत करण्यात आली आहे. मात्र, बँकेची कर्जवसुली आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित फौजदारी खटले या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे ईडीने म्हटले आहे. मल्ल्याकडून संपूर्ण रक्कम वसूल झाली असली तरी, त्याच्यावरील फौजदारी कारवाई कोणत्याही परिस्थितीत समाप्त केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका ईडीने घेतली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या