प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून, या अग्रीम मदतीसाठी एकूण ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ऑक्टोबर अखेरीस दिवाळीपूर्वी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी अग्रीम मदत दिली जात आहे. यापूर्वीच्या सरकारांनी अंतिम मदत म्हणून केवळ एक हजार रुपये दिले होते, मात्र आता किमान मदतच पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.
कालपर्यंत नुकसानीचे ८३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, १०० टक्के पंचनामे करून सरसकट मदत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवाळीआधी ज्यांचे पंचनामे पूर्ण होतील, त्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
आचारसंहितेचे कारण देत काही अधिकारी दुष्काळ निवारणाच्या बैठकांना उपस्थित राहत नसल्याची तक्रार मंत्र्यांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. "दुष्काळाच्या बैठकीला कोणी अधिकारी आचारसंहितेचे कारण सांगून येत नसतील, तर त्यांची नावे मला सांगा, त्या सर्वांना निलंबित करून टाकीन," असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी आचारसंहिता लागू होत नाही आणि त्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नसते, त्यामुळे मंत्र्यांनी आपले अधिकार वापरावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘हनुमान अंश’सारखा ब्लॉकबस्टर! अडीच कोटींच्या ‘प्रेमदा ऊराली’ची १८ दिवसांत ५० कोटींची कमाई
- ‘दीदी तेरा देवर दिवाना’ मधील ‘त्या’ सीनसाठी माधुरीने घेतले होते १५ रीटेक; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उलगडला किस्सा
- डिझेलला पैसे नाहीत म्हणून बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवलं; हतबल बापाने खांद्यावरून गाठलं रुग्णालय





