प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'हम आपके हैं कौन' चित्रपटातील 'दीदी तेरा देवर दिवाना' हे गाणे आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या गाण्यातील एका विशेष सीनच्या चित्रीकरणासाठी माधुरी दीक्षितला चक्क १० ते १५ रीटेक द्यावे लागले होते. 'कोण होणार करोडपती' या मराठी रिअॅलिटी शोमध्ये माधुरीने स्वतः चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा किस्सा उलगडला.
या शोमध्ये सहभागी झालेल्या प्राजक्ता तावडे या कथ्थक नृत्यांगनेने माधुरीला एक खास सरप्राईज दिले. त्यांनी 'हम आपके हैं कौन' चित्रपटातील माधुरीच्या प्रसिद्ध लूकची झलक मंचावर सादर केली. या सादरीकरणामुळे जुन्या आठवणींना उजाळा देत माधुरीने गाण्यातील गुलेल आणि फुलाच्या सीनचा मजेशीर अनुभव सांगितला.
पडद्यावर अतिशय सहज आणि मजेशीर वाटणाऱ्या या सीनच्या चित्रीकरणात अनेक अडचणी आल्या होत्या. गुलेलमधून मारलेले फूल कधी तुटायचे, कधी त्याचा निशाणा चुकायचा तर कधी ते लांब जाऊन पडायचे. त्यामुळे हा प्रसंग व्यवस्थित शूट करण्यासाठी तब्बल १० ते १५ वेळा रीटेक घ्यावे लागले. विशेष म्हणजे, हा सीन पडद्यावर विचित्र दिसेल अशी भीती निर्मात्यांना वाटत होती.
मात्र, योग्य कॅमेरा अँगल वापरल्यास हा प्रसंग खूप सुंदर आणि गोड दिसेल, असा विश्वास माधुरी आणि कोरिओग्राफर्सनी निर्मात्यांना दिला. अखेर त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले आणि प्रेक्षकांनी या सीनला डोक्यावर घेतले. सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षितसोबत अनुपम खेर, रीमा लागू, आलोक नाथ, रेणुका शहाणे, मोहनीश बहल आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. कौटुंबिक नाती आणि भावनांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी आजही भरभरून प्रेम दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- डिझेलला पैसे नाहीत म्हणून बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवलं; हतबल बापाने खांद्यावरून गाठलं रुग्णालय
- नाना पाटेकरांनी प्रसिद्ध निर्मात्याला मटण खाऊ घातलं अन् भांडी घासायला लावली; परेश रावल यांनी सांगितला किस्सा
- सिनेसृष्टीचं काळं सत्य! ‘नव्या अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकललं जातं’, तनुश्री दत्ताचा खळबळजनक दावा





