तळेगाव, 14 ऑक्टोबर: तळेगाव येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमात राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी मोठी घडामोड पाहायला मिळाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते जयंत पाटील हे दिग्गज नेते एकाच ठिकाणी एकत्र आले होते.
या कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील यांनी स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या शेजारीच शरद पवार हेदेखील उपस्थित होते. यानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही चर्चा झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या नेत्यांमध्ये नेमकी काय गुफ्तगू झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नसून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या, तसेच शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटाकडून या चर्चांचे वेळोवेळी स्पष्ट शब्दांत खंडन करण्यात आले असले तरी, आधूनमधून यावर बोलले जाते. आता या भेटीच्या निमित्ताने नेत्यांमध्ये याच मुद्द्यांवर काही चर्चा झाली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून उपाययोजना सुरू केल्या आहेत, तर केंद्रीय पथकानेही राज्याच्या दुष्काळाचा आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी या राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) मागणीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी, असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या चर्चेचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.





