डिझेलला पैसे नाहीत म्हणून बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवलं; हतबल बापाने खांद्यावरून गाठलं रुग्णालय

डिझेलसाठी पैसे नसल्याने दिंद्रुडमध्ये एका बेशुद्ध मुलीला शासकीय रुग्णवाहिकेतून उतरवण्यात आले. हतबल पित्याने मुलीला खांद्यावर उचलून घेत दुसरे रुग्णालय गाठले.

mahasatta

माजलगाव, 14 ऑक्टोबर: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रात माणुसकीला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार घडला आहे. डिझेलसाठी पैसे नसल्याने एका बेशुद्ध चिमुरडीला चक्क शासकीय रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले. यानंतर हतबल झालेल्या पित्याने आपल्या बेशुद्ध मुलीला खांद्यावर उचलून घेत दुसरे रुग्णालय गाठले.

पाचवीत शिकणाऱ्या या मुलीला अचानक फिट आल्याने ती बेशुद्ध पडली होती. उपचारांसाठी तिला सुरुवातीला दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मुलगी बेशुद्ध असल्याने तिला पुढील उपचारांसाठी इतरत्र हलवण्याचा सल्ला देत डॉक्टरांनी 'रेफर लेटर' दिले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने खासगी वाहन परवडणारे नव्हते. त्यामुळे मुलीच्या आजीने शासकीय रुग्णवाहिकेची मागणी केली.

रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर वडील मुलीला घेऊन आत बसले. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे डिझेलसाठी पैशांची मागणी करण्यात आली. 'आम्ही मोलमजुरी करून जगतो. आमच्याकडे पैसे नाहीत,' असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यावर 'पैसे नाहीत तर मुलीला जन्मच कशाला दिला?' असा संतापजनक प्रश्न डॉक्टरांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पैशांअभावी अखेर मुलीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले.

तातडीने उपचारांची गरज असताना रुग्णवाहिकेतून खाली उतरवल्यामुळे पित्यासमोर मोठे संकट उभे राहिले. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने या हताश बापाने बेशुद्ध मुलीला खांद्यावर उचलून घेतले आणि दुसऱ्या रुग्णालयाकडे धाव घेतली. तिथे उपचार मिळाल्यानंतर मुलगी शुद्धीवर आली आणि कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले. या मुलीने सहा वर्षांपूर्वीच आपली आई गमावली असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाने मुलीच्या उपचारांसाठी सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींकडे मदतीची मागणी केली आहे.

या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जाब विचारला. यावर डॉक्टर निलेश ढाकणे यांनी गावकऱ्यांची माफी मागितली आहे. मुलगी बेशुद्ध अवस्थेत आली असताना तिला शुद्धीवर आणण्यासाठी आपण स्वतःच्या पैशाने इंजेक्शन आणून दिल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. तसेच, 'माझ्या तोंडून जे काही शब्द गेले आहेत, त्याची पुनरावृत्ती यापुढे होणार नाही, याची मी काळजी घेईन,' असेही डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही गरीब रुग्णाकडे डिझेलसाठी पैशांची मागणी केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फोनवरून संपर्क साधून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या