मुंबई, 5 ऑक्टोबर: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा संघर्ष उभा राहिला आहे. ठाकरे बंधूंनी मुंबईत काढलेल्या ‘गर्जना मोर्चा’ला भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्यांना रवींद्र चव्हाण यांनी थेट आव्हान दिले आहे. त्यांनी अमित शाह यांच्या भूमिकेचा एक विशेष व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या प्रक्रियेला विरोध करण्यापूर्वी विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना तीन प्रमुख सवाल विचारले आहेत. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे हे घुसखोरांनी ठरवायचे का आणि तसे झाल्यास लोकशाही सुरक्षित राहील का? असा पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, एका मतदाराला एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का आणि मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत असावीत का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी या प्रश्नांची उत्तरे टाळून एसआयआर प्रक्रियेला विरोध करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनीही ठाकरे बंधूंच्या मोर्चावर बोचरी टीका केली आहे. हा मोर्चा म्हणजे कोणतीही गर्जना नसून केवळ राजकीय ‘कोल्हेकुई’ आहे, असे शेलार म्हणाले. मुंबईतील हा मोर्चा आणि त्यानंतर भाजपने चढवलेला आक्रमक हल्ला पाहता, आगामी काळात एसआयआर प्रक्रियेचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.







