निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी ठाकरे बंधूंची नौटंकी; रामदास कदमांचा घणाघात

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेला मोर्चा म्हणजे नौटंकी असून, अपयश लपवण्यासाठीच आयोगाला बदनाम केले जात असल्याची टीका रामदास कदम यांनी केली.

Ramdas Kadam criticizes Thackeray brothers over Election Commission march

प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदारयादी पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेतील (SIR) कथित गैरप्रकारांच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार टीका केली असून, स्वतःचे अपयश लपवण्यासाठीच ठाकरे बंधू निवडणूक आयोगाला बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठाकरे बंधूंच्या या आंदोलनात किती पक्ष सहभागी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे कदम म्हणाले. काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले, तेव्हा ज्ञानेश कुमार यांनी गडबड केली नाही, असे उद्धव ठाकरेंना वाटते का? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. ‘बूंद से जाती है, वो हौद से नहीं आती’, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे आणि जवळची माणसे का सोडून गेली याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ठाकरे बंधू राज्यात केवळ नौटंकी करून जनतेची दिशाभूल करत असून एक दिवस ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल’, असा घणाघात त्यांनी केला.

राजकीय विषयात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे योग्य नाही, असे सांगत सीजेपीने (CJP) निवडणूक आयुक्तांचा विषय हातात घेणे अयोग्य असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्राला बदनाम करण्याची राजकीय खेळी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सीजेपीला कोणीतरी चालवत असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न केंद्रस्थानी ठेवावेत; त्यासाठी आपण त्यांच्यासोबत राहू, असे आवाहन कदम यांनी केले.

दरम्यान, आपण पर्यावरणमंत्री असताना मिठी नदीसाठी मोठ्या प्रमाणात काम केल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. नदीच्या दोन्ही बाजूंना रस्ते, रुंदीकरण, अनधिकृत बांधकामे हटवणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडण्याचा प्रस्ताव आपण तयार केला होता. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी आल्यानंतर आपले हे निर्णय थांबवण्यात आले. आपल्या प्रस्तावानुसार काम झाले असते, तर मिठी नदीचा सुमारे २० किलोमीटरचा भाग स्वच्छ होऊन पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास झाला असता, असे कदम म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या