‘साखर कारखाने ढापणाऱ्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न काय समजणार?’; एमपीएससी आंदोलनावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

MPSC Protest Gopichand Padalkar criticizes Rohit Pawar over student agitation

प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मागील तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भिमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सहभागी झाल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ज्यांचा धंदा साखर कारखाने ढापण्याचा आहे, त्यांना विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न काय समजणार, असा घणाघात पडळकर यांनी केला. रोहित पवार हे शरद पवारांची पुढची आवृत्ती असून ते केवळ राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आजोबा चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एमपीएससीसाठी किती वेळ दिला, असा सवाल उपस्थित करत पडळकरांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. एमपीएससी अध्यक्षांसोबतचे जुने खटके असल्याने हे वचपा काढण्याचे राजकारण सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी पवारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाची सोडवणूक केल्याचे श्रेय मिळेल, या भीतीने हे घाणेरडे राजकारण केले जात आहे. रोहित पवारांना कोणीतरी सल्ला दिला आहे की एमपीएससीच्या माध्यमातून ते गावोगावी पोहोचू शकतील, मात्र हेच विद्यार्थी त्यांना बाजारात विकतील, असा टोलाही त्यांनी लगावला. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळासह तीन तास बैठक घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांच्या विलंबाने लागणाऱ्या निकालांवरून पडळकर यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. निकाल आणि नियुक्त्या वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यांचे विवाह रखडत आहेत. त्यामुळे एमपीएससीमधील कर्मचारी दर दोन वर्षांनी बदलण्याची मागणी त्यांनी केली. पेपरफुटीसारखे गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांना जोड्याने मारले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सध्या व्ही. राधा समिती आयोगात चांगले काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मविआ सरकारच्या काळातही पेपरफुटी झाल्याचा दावा त्यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या