प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) घेणार आहेत. ते येत्या सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी पुण्यातील आंदोलनस्थळी जाऊन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील नियोजित मोर्चानंतर राज ठाकरे पुण्याकडे रवाना होतील. सोमवारी सकाळी ते आंदोलनस्थळी पोहोचतील आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या तसेच आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतील. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे या प्रश्नावर कोणती भूमिका मांडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
MPSC परीक्षेतील कथित अनियमितता, पेपरफुटी प्रकरण, रखडलेली भरती प्रक्रिया आणि आयोगाच्या एकंदर कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यातूनच त्यांनी पुण्यात आंदोलन पुकारले असून, MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि MPSC विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत सचिवांची बदली, परीक्षा प्रक्रिया ऑफलाइन करण्याबाबतचे आश्वासन आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या चौकशीबाबत सरकारकडून भूमिका मांडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने पुन्हा आंदोलन सुरू केल्याने पुण्यात हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.







