पुणे, 3 ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी आणि रखडलेल्या भरती प्रक्रियेविरोधात पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे ‘सत्याग्रह’ आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला आता काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिला आहे.
पुण्यातील ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पेपरफुटी, महागडे शिक्षण, हॉस्टेलची दुरवस्था आणि ‘डीबीटी’मधील फसवणुकीच्या समस्या मांडल्या होत्या, अशी आठवण राहुल गांधी यांनी करून दिली. याबाबत आपण देवेंद्र फडणवीस यांना एमपीएससीमध्ये सुधारणा करून परीक्षा पद्धती पारदर्शक करण्यास सांगितले होते, परंतु काहीही कारवाई न झाल्याने विद्यार्थी आज सत्याग्रहावर बसल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या अजिबात गैर नसून त्यांना आश्वासनांऐवजी ठोस कारवाई हवी आहे, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून लढण्याचे निर्देश त्यांनी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयला (NSUI) दिले आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असलेल्या संस्थेवर कब्जा करण्यात आला असून आम्ही हे चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या जागी एका प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि ७० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.





