प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी पार पडला. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव न घेता त्यांच्या आधीच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. मंचावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना, "काही जणांचा फोन २०१९ सालानंतर थांबला तो थांबला," असा सडेतोड टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
या विधानाला २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमाची किनार आहे. 'महाराष्ट्राची हास्यरेषा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी फडणवीसांनी मिश्किलपणे म्हटले होते की, "२०१९ सालापर्यंत उद्धव ठाकरेंनी जेव्हा-जेव्हा फोन केला, तेव्हा-तेव्हा मी गेलो. पण २०१९ सालानंतर त्यांनी बोलावलंच नाही." याच विधानाचा धागा पकडून ठाकरेंनी आजच्या सोहळ्यात पलटवार केला.
आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. "सामनात काही गडबड असेल तर मी संजयला फोन करायचो. तोपर्यंत बाळासाहेबांचा राग शांत झालेला असायचा. ओव्या कोणाला द्यायच्या आणि शिव्या कोणाला द्यायच्या, हे संजय राऊतांना कळतं," असा किस्सा त्यांनी सांगितला.
सध्याच्या काळात लिखाण कमी होत चालल्याबद्दलही उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केले. "आताच्या पिढीला काही हवं असेल तर 'चॅट जीपीटी' (Chat GPT) आहे. आज वाचण्याची वेळ राहिली नाही," असे ते म्हणाले. याच कार्यक्रमात राज ठाकरे यांनीही आपले विचार मांडले. मात्र त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य न करता आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचे किस्से उपस्थितांना सांगितले.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वेच्या ॲडव्हान्स तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल; आता १२० ऐवजी ६० दिवस आधीच करता येणार आरक्षण
- राधिका आपटेचा देवावर विश्वास नाही; म्हणाली, “लोकांनी मूर्तीपेक्षा निसर्गाची पूजा करावी”
- अभिनेते अभिजीत केळकर यांच्या जीवाला धोका; फेसबुक पोस्टद्वारे फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत




