राज आणि उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय बैठक नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद खोलीत कोणतीही राजकीय चर्चा किंवा बैठक झाली नसल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर दिले आहे.

mahasatta

पुणे, 31 ऑक्टोबर: पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत गुप्त किंवा बंद खोलीत बैठक झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, अशी कोणतीही राजकीय बैठक झाली नसून यातून वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबईमध्ये राज्यातील गेल्या १०० वर्षांतील ७५ व्यंगचित्रकारांवर आधारित असलेल्या 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आपण या कार्यक्रमात केवळ एक साहित्यप्रेमी म्हणून सहभागी झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंचावर जाण्यापूर्वी सर्व नेते आणि काही व्यंगचित्रकार एकत्रच वेटिंग रूममध्ये बसले होते. त्यानंतर वेळ झाल्यावर सगळे एकाच वेळी मंचावर गेले. तिथे झालेली भाषणे अत्यंत हलकीफुलकी आणि हास्यविनोद फुलवणारी होती. राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येणे हीच महाराष्ट्राची संस्कृती असून, जनतेलाही ते आवडते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, याच वेळी बोलताना त्यांनी राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणावरही भाष्य केले. ग्रीन मोबिलिटीला राज्याचे प्राधान्य असून आगामी ३ ते ४ वर्षांत एकट्या महाराष्ट्रात ५० हजार इलेक्ट्रिक बसेसची आवश्यकता असेल, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई महापालिकेला १० हजार, तर एसटी महामंडळाला ३० हजार ई-बसेस खरेदी करायच्या आहेत. त्यासोबतच पुणे आणि नागपूरमध्येही या बसेसची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या मागणीच्या तुलनेत बसेसचे उत्पादन होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 'पिनॅकल' कंपनीच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी कंपनीला आपली उत्पादनक्षमता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत या बसेस उपलब्ध झाल्यास त्या अधिक सोयीस्कर ठरतील. तसेच, राज्यात निर्माण होणाऱ्या ई-व्हेईकल इकोसिस्टीमचा राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या