अभिनेते अभिजीत केळकर यांच्या जीवाला धोका; फेसबुक पोस्टद्वारे फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत

मराठी अभिनेते अभिजीत केळकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक दावा केला असून, मालाडमधील घरांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

mahasatta

मुंबई, 1 नोव्हेंबर: प्रसिद्ध मराठी अभिनेते अभिजीत केळकर यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मालाडमधील चाळीतील घरे जमीनदोस्त करण्यासाठी काही बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे हस्तक्षेपाची आणि मदतीची मागणी केली आहे.

केळकर यांनी स्पष्ट केले की, मालाड पूर्व परिसरातील पुष्पापार्क आणि बाणडोंगरी भागात त्यांची वडिलोपार्जित घरे आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून आणि काडी-काडी जमवून हा संसार उभा केला होता. या वस्तीला कोणी झोपडपट्टी म्हणत असले, तरी गरिबांचे छप्पर हिरावून त्यांना थेट रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

बिल्डरांच्या पैशाच्या बळावर लोकप्रतिनिधी संपूर्ण व्यवस्था नियंत्रित करत असून तिला हातावर खेळवत असल्याचा आरोप केळकर यांनी केला. कोणताही कायदेशीर करार न करता आणि कोणतीही कागदपत्रे न दाखवता घरे पाडली जात आहेत. तसेच लोकांना धमकावण्यासाठी गुंड पाठवले जात असल्याचा गंभीर प्रकार आपण गेल्या सहा महिन्यांपासून पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या कोणालाही बदनाम करायचे नसल्याने आपण कोणाचे नाव घेणार नाही, मात्र वेळ आल्यावर नावे उघड करावीच लागतील, असा इशारा त्यांनी दिला. "मी कोणाला घाबरत नाही, पण माझ्या जीवाला धोका आहे. घरी आई, बायको, मुलांना सांगून मी निघालोय," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. फडणवीस आणि शिंदे यांच्याबद्दल मनात नितांत आदर असला, तरी येथे 'दिव्याखाली अंधार' असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी हक्काची घरे आणि न्यायासाठी आवाहन केले आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या