पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके कमकुवत नाहीत; ED कारवाई आणि शोच्या वादावर शेखर सुमन यांचे स्पष्टीकरण

‘शेखर टुनाईट’ या आपल्या नवीन यूट्यूब शोमुळे अभिनेते शेखर सुमन सध्या चर्चेत आहेत. या शोमधून ते भाजप सरकारला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

mahasatta

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: 'शेखर टुनाईट' या आपल्या नवीन यूट्यूब शोमुळे अभिनेते शेखर सुमन सध्या चर्चेत आहेत. या शोमधून ते भाजप सरकारला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता एका ताज्या मुलाखतीत सुमन यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके कमकुवत नाहीत की ते माझ्या एवढ्या छोट्या कार्यक्रमावरून मला उचलतील', असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले आहे.

निर्माते धर्मेश शंगानी यांच्यावर पडलेल्या छाप्याचा आणि आपल्या शोचा कोणताही संबंध नसल्याचे शेखर सुमन यांनी स्पष्ट केले. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना वर्गातील मॉनिटरशी केली. "जर मॉनिटरने चूक केली, तर विद्यार्थी घाबरतील आणि त्यालाच दोष देतील, बरोबर? मॉनिटर कोणीही असो, काही फरक पडत नाही," असे सुमन म्हणाले. आपल्या शोचा उद्देश कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षावर किंवा नेत्यावर टीका करणे नसून व्यवस्थेतील त्रुटी समोर आणणे असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारण्यांवर व्यंग करण्याची आपली पद्धत जुनी असल्याचे सांगताना त्यांनी १९९७ मध्ये सुरू झालेल्या 'मूव्हर्स अँड शेकर्स' या कार्यक्रमाचा संदर्भ दिला. त्याकाळी आम्ही तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यावरही व्यंग करायचो, असे ते म्हणाले. आपण कोणत्याही व्यक्तीवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर भाष्य करत असून, जनतेचा आवाज उठवणे हेच आपले काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्या सत्तेत दुसरे कोणी आले तरी आपण हेच करू, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोघांबद्दलही आपल्या मनात आदर असल्याचे शेखर सुमन यांनी नमूद केले. मात्र, काही चुकीचे घडल्यास टीका करणे योग्यच आहे. सोशल मीडियावरून मोदींवरील टीकेचे व्हिडिओ हटवले जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "असे घडते. यासाठी एका व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही, पण व्यवस्थेत काहीतरी चूक नक्कीच आहे. जे नेतृत्व करत आहेत ते केवळ चेहरे आहेत, पण उत्तरदायित्व असलेच पाहिजे."

पंतप्रधान मोदी हे अतिशय शक्तिशाली व्यक्ती असून, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 'शेखर टुनाईट'च्या पलीकडेही जगात अनेक समस्या आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधानांना टीका आवडते असे म्हटल्यामुळेच आपण हा शो सुरू केल्याचे शेखर सुमन यांनी आवर्जून सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या