आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह सीजेपीच्या ३ नेत्यांना दिल्लीत अटक; तिहार जेलमध्ये रवानगीची शक्यता

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीजेपीच्या ३ नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून, त्यांना तिहार जेलमध्ये पाठवले जाण्याची शक्यता आहे.

mahasatta

दिल्ली, 14 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) तीन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे अशी या नेत्यांची नावे आहेत. जंतरमंतरवर जाण्यास बंदी असतानाही त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी ही धरपकड केली. या आंदोलनामुळे दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर असून राजकीय वातावरण तापले आहे.

वकील रत्ना सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही नेत्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे जंतरमंतरवर जाणे, जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणे आणि सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पहाटे ३ वाजता एका खाजगी व्हॅनमधून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांना वकिलांना भेटू दिले गेले नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या नेत्यांना सकाळी एसईएम (SEM) न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, त्यांना तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलनास परवानगी दिलेली नाही, मात्र तरीही सीजेपीने आपल्या कार्यकर्त्यांना सध्या दिल्ली न सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर इंडिया आघाडीचेही मोर्चे सुरू असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

यापूर्वी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी विमानातून ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्यांना काही अटी-शर्तींवर जामीन मिळाला होता. सध्या अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याने ते हिंगोलीत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, 'आमचे मनोधैर्य कोणीही खचवू शकत नाही,' अशी ठाम भूमिका मांडली आहे.

काही महिन्यांपूर्वी नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी सीजेपीने मोठे आंदोलन उभे केले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुकारलेल्या या आक्रमक आंदोलनानंतर प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी पक्ष पुन्हा आक्रमक झाला असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या