प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये एका चित्रपटासाठी मोठी रक्कम घेणारे नाना अत्यंत साधे आयुष्य जगतात. त्यांच्या मुंबईतील अंधेरी येथील घराचा आकार अवघा ७५० चौरस फूट असून, या १ बीएचके (1BHK) फ्लॅटमध्ये कोणत्याही ऐषोरामाच्या वस्तू नाहीत.
या छोट्याशा घरात नाना आपल्या आईसोबत राहायचे. गरजा अत्यंत मर्यादित असल्यामुळे त्यांच्या या घरात केवळ तीन चटया, एक जीम आणि काही पुस्तकेच होती. एका कार्यक्रमात स्वतः नाना पाटेकर यांनी त्यांच्या या घराविषयी आणि साधेपणाविषयी खुलासा केला होता.
नानांच्या या साधेपणामागे त्यांनी बालपणी अनुभवलेली गरिबी हे मुख्य कारण आहे. पडत्या काळात मित्रांकडून पैसे उधार घेऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह केला होता. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी, नववीत असताना त्यांनी नोकरीला सुरुवात केली. त्यावेळी कामासाठी ते दररोज १६ किलोमीटरची पायपीट करायचे.
त्याकाळी त्यांना महिन्यातून फक्त ३५ रुपये पगार आणि एक वेळचे जेवण मिळायचे. त्या खडतर काळाच्या तुलनेत आजचे वन बीएचके घरातील जगणे लक्झरियस असल्याचे नानांनी सांगितले होते. चमचमीत पदार्थांचा किंवा पार्ट्यांचा त्यांना कधीच मोह नव्हता. ताटात वाढलेले अन्न ते कधीही वाया घालवत नाहीत.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात अभिनेते सचिन खेडेकर यांनी अन्नाविषयी विचारले असता, "टाकायचं कुठलं रे. तेवढी आपली पात्रताही नाही," असे उत्तर नानांनी दिले होते. याच कार्यक्रमात त्यांनी 'पुरुष' या नाटकातील अनुभवावरही भाष्य करत सलग १६ वर्षे एकाच नाटकात अडकून राहिल्याची खंत व्यक्त केली.
पैशांच्या मोहापायी आपण हे करत राहिलो, ज्यामुळे इतर तीन-चार नाटके करण्याची संधी हुकली, असे ते म्हणाले. गाडी, घर यांसारख्या भौतिक गरजांसाठी माणूस थांबत नाही, त्याला कायम 'आपल्याला अजून पाहिजे, अजून पाहिजे असतं', अशी स्पष्ट कबुलीही नानांनी यावेळी दिली.





