प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर चर्चेत आलेला विद्यार्थी नेता विवेकानंद पाटील याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला आहे. 'लढ्याला यश मिळाले असून आता मुंबईला येऊन भेटून जा,' असा निरोप राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती स्वतः विवेकानंदने दिली आहे. त्यानुसार लवकरच आपण मुंबईला जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
गेले दोन आठवडे पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री स्थगित करण्यात आले. सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करत चौकशी समिती स्थापन केल्याने हा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण लढा काळात आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजीत कदम विद्यार्थ्यांसोबत होते. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेदेखील फोनवरून सातत्याने विचारपूस करत होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली होती.
या आंदोलनादरम्यान कोल्हापूरचा विवेकानंद पाटील त्याच्या सडेतोड आणि मुद्देसूद भाषणांमुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. कोल्हापुरी लकबीत आणि हजरजबाबीपणे भाषणे करताना त्याने भाजपच्या अनेक नेत्यांवर निशाणा साधला. मात्र, तोडीसतोड उत्तरे देताना त्याने भाषेची मर्यादा ओलांडली नाही. त्याच्या या रांगड्या शैलीचे आणि भाषणांचे आंदोलनस्थळी भेट देणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनीही कौतुक केले.
आंदोलन स्थगित झाल्यानंतर विवेकानंद त्याच्या मूळ गावी, कोल्हापूर जिल्ह्यातील माजगाव (ता. राधानगरी) येथे परतला. तिथे गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. यावेळी त्याने गावातही जोरदार भाषण करत उपस्थितांची दाद मिळवली. याचदरम्यान त्याला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी त्याला मुंबईत भेटीसाठी आमंत्रित केले आहे.







