प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, छठपूजेच्या मुद्द्याचा वापर करून भाजप महाराष्ट्रात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ठाकरे यांनी सांगितले की, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया या वादाला खतपाणी घालत आहे. याच हेतूने सोशल मीडियावर सांस्कृतिक आक्रमणाच्या रिल्स पसरवल्या जात आहेत. तसेच, मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून वाद निर्माण करण्याचा डाव होता, परंतु मनसेने तो प्रयत्न उधळून लावला, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजपचे 'फोडा आणि राज्य करा' हे धोरण यापुढे चालणार नाही, असे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी मराठी माणसाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भाजपने रचलेल्या या सापळ्यात मराठी जनतेने अजिबात अडकू नये, असे ते म्हणाले.
भाजपला राज्यात जसा संघर्ष अपेक्षित होता, तसा तो अद्याप उभा राहिला नसल्याने त्यांना खंत वाटत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. भाजपची बौद्धिक क्षमता आता कमकुवत झाली असून, केवळ केलेली कामे दाखवून त्यांना निवडणुका जिंकता येत नाहीत, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; दर्शन विचारे शिंदे गटात प्रवेश करणार
- भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार, राज ठाकरेंचा मोठा दावा
- मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला; पोलिसांकडून तिघांना अटक, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा




