छत्रपती संभाजीनगर, 13 नोव्हेंबर: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरावर काल रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर शिरसाट यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. थेट कॅबिनेट मंत्र्याच्या निवासस्थानावरच हल्ला झाल्याने आमदार रोहित पवार यांनी राज्याच्या गृहविभागावर आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
या घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे अशी अटक करण्यात आलेल्या या तिन्ही संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी या तिघांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये बेकायदेशीररीत्या घरात प्रवेश करणे, दमदाटी व धमक्या देणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे या आरोपांचा समावेश आहे. यासोबतच मालमत्तेचे नुकसान करणे, शारीरिक इजा पोहोचवणे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नावरूनही त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या घरावर झालेला हल्ला धक्कादायक असून, यातून गृहविभागाचे धिंडवडे उडाले आहेत. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याचं घरच सुरक्षित नसेल, तर तिथं सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
रात्री घडलेल्या या संपूर्ण घटनेच्या सखोल तपासाची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच सरकारला धारेवर धरताना ते म्हणाले, "सत्तेतील मित्रपक्षांसोबत कठपुतळीचा खेळ खेळणाऱ्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेची तरी गांभीर्याने दखल घ्यावी," असा थेट निशाणा त्यांनी साधला आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- IND vs NZ : धोनीची निवृत्ती ते रोहित-विराटची दाणादाण; मॅट हेन्री ठरला टीम इंडियासाठी पुन्हा ‘काळ’
- रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, २०५ डावांनंतर पहिल्यांदाच ठरला ‘गोल्डन डक’चा शिकार
- सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याच अपहरणाचा कट होता; अमित देशमुखांचा खळबळजनक आरोप




