प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: 'काय समजतेस काय स्वत:ला? माझ्या समोर सिनेमे निवडण्याइतकी मोठी झालीस का तू?' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला सुनावलं होतं. एका चित्रपटाच्या ऑफरला नकार दिल्याच्या कारणावरून नाना तिच्यावर प्रचंड संतापले होते.
'लोकसत्ता' वृत्तपत्रात लिहिताना सोनाली कुलकर्णीने नाना पाटेकर यांच्यासोबतच्या या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुरुवातीच्या काळात नाना आणि सोनाली यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. मात्र, याच वादांमधून त्यांच्यात एक घट्ट आणि कधीही न संपणारं सौहार्दाचं नातं निर्माण झाल्याचं तिने सांगितलं. नानांच्या रोखठोक आणि रांगड्या स्वभावामागे त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा असल्याचं ती म्हणते.
या जुन्या किस्स्याबद्दल सांगताना सोनालीने नमूद केलं की, काही वर्षांपूर्वी तिला एका चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र, त्या चित्रपटाच्या निर्मात्याचं वर्तन तिला अजिबात पसंत पडलं नाही. त्यामुळे दिग्दर्शकाचा कोणताही विचार न करता तिने निर्मात्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेत चित्रपटाला थेट नकार दिला. त्या काळात सोनाली एका भाड्याच्या घरात राहत होती.
तिचा नंबर मिळवून नाना पाटेकर यांनी तिला अचानक फोन केला आणि चित्रपटातील सीन्सच्या रिहर्सलसाठी स्वतःच्या घरी बोलावलं. त्यावेळी सोनालीने आपण तो चित्रपट करत नसल्याचं त्यांना स्पष्ट सांगितलं. तिचा हा नकार ऐकताच नानांचा पारा चढला आणि त्यांनी तिला रागातच खडेबोल सुनावले.
नानांचा हा राग आणि संताप पाहूनही सोनालीने आपला निर्णय अजिबात बदलला नाही. दिग्गज अभिनेत्यासमोरही ती आपल्या भूमिकेवर ठाम राहिली व चित्रपट नाकारण्यामागचं नेमकं कारण तिने नानांना स्पष्टपणे सांगितलं. एनसीपीएमध्ये नानांना 'ऑथेल्लो' साकारताना पाहिल्यापासून त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक विशेष प्रतिमा असल्याचंही सोनालीने या आठवणीत लिहिलं आहे.





