अकोला, 13 ऑक्टोबर: राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना आणि कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश असतानाही, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच असल्याचे समोर आले आहे. सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत अकोला जिल्ह्यात वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या पत्नीचे फोटो काढल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. येथील शेतकरी योगेश नागपुरे यांच्या घरी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कर्जवसुलीसाठी पोहोचले होते. शेतकरी घरात नसताना या प्रतिनिधींनी त्यांच्या पत्नीचे फोटो काढले. तसेच कुटुंबाला धमकावल्याचा आरोपही होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडीओही समोर आला असून, कर्जदार शेतकऱ्यांची धरपकड केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या राज्यात एल निनोचे संकट आणि ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्य सरकारने पाहणी करून दुष्काळ जाहीर केला आहे, तसेच केंद्राच्या पथकानेही नुकतीच राज्याची पाहणी केली. येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडील कर्जवसुली थांबवण्याची घोषणा सरकारने केली होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतरही ग्रामीण भागात पतसंस्था, छोट्या बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्याचा अधिकार नसतानाही, कंपन्यांचे प्रतिनिधी घरी जाऊन धाकदपटशा दाखवत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.





