माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; चाकू जप्त केल्याचा टीएमसीचा दावा

कोलकातामध्ये दुर्गा पूजा मंडपाच्या उद्घाटनादरम्यान माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा टीएमसीने केला असून, एका तरुणीकडून चाकू जप्त करण्यात आला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. कोलकाता येथील कालीघाटमध्ये दुर्गा पूजा मंडपाच्या उद्घाटनादरम्यान एका तरुणीने हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

टीएमसीने केलेल्या दाव्यानुसार, या तरुणीने ममता बॅनर्जी यांची साडी खेचली. तसेच, तिच्याकडून एक चाकूही जप्त करण्यात आला आहे. या कथित हल्ल्याच्या घटनेमुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर टीएमसी नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे समोर येत आहे. ४ मे रोजी दक्षिण २४ परगणा मतदारसंघात निकालानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी आणि चप्पल फेकण्यात आली होती. तसेच सोनारपूरमध्ये एका गटाने त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्याविरोधात ‘चोर चोर’ अशी नारेबाजी केली होती.

यानंतर कुणाल घोष यांच्यावरही हल्ला झाला होता. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर फोनवर बोलत असताना एका तरुणाने घोष यांच्यावर अंडी फेकली होती. याशिवाय सप्टेंबर महिन्यात हुगळीतील उत्तरपाडा येथे ममता बॅनर्जी यांच्या रॅलीसाठी कारने जात असताना काही लोकांनी घोष यांची गाडी अडवून अंडी आणि दगडफेक केली होती. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली होती.

विधानसभा निवडणुकीनंतर टीएमसी नेत्यांवर आणि थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरही सातत्याने हल्ले होऊ लागल्याने पश्चिम बंगालमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या