प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासूनच जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजप यांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेतील फोटो समोर आल्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली असून, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची तारीखही निश्चित झाल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेला जेडीयू नेते आणि केंद्रीय मंत्री लल्लन सिंह हेदेखील उपस्थित होते. या घटनेचा फोटो समोर येताच आरजेडी आणि काँग्रेसने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. आरजेडीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका भारती यांनी इन्स्टाग्रामवर या फोटोवर भाष्य करत म्हटले आहे की, जेडीयू आता कोणत्याही क्षणी भाजपसोबतच्या विलीनीकरणाची घोषणा करू शकते. जेडीयूने समाजवादाच्या तत्त्वांशी तडजोड केली असून समाजवाद विकताना ते जातीयवादी दुकानाचे विक्रेते बनले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
या घडामोडींवर बिहार काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. स्नेहाशीष वर्धन यांनीही गंभीर आरोप केले आहेत. भाजपने आपल्या मित्रपक्षांमध्ये 'स्लीपर सेल' पुन्हा तयार केले असून ते बाहुल्यांप्रमाणे काम करत असल्याचे ते म्हणाले. जेव्हा नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्यात आले, तेव्हा जेडीयूच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षातील हे स्लीपर सेल उघडपणे समोर आणले होते. मात्र, भाजपच्या आशीर्वादाने ते जेडीयूमध्येच राहिले असल्याचे वर्धन यांनी स्पष्ट केले.
मित्रपक्षांना गिळंकृत करण्याचा भाजपचा मोठा इतिहास असून त्यांनी जेडीयूबाबतही असेच केल्यास आश्चर्य वाटायला नको, असे स्नेहाशीष वर्धन पुढे म्हणाले. उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षातही भाजपने स्लीपर सेल नेमले होते आणि हे विधान परिषद निवडणुकीत स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला. प्रादेशिक पक्षांनी वाढावे अशी भाजपची कधीच इच्छा नसते, हे प्रादेशिक पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळीच समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.





