प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: जगभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या फ्रँचायझी क्रिकेट लीग्जवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) एकसमान नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या आठवड्याअखेरीस बाली येथे होणाऱ्या बैठकीत यावर खलबते होणार असून, या संभाव्य बदलांचा सर्वाधिक फटका अमेरिका आणि यूएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या एमएलसी (MLC) आणि आयएलटी२० (ILT20) या स्पर्धांना बसण्याची शक्यता आहे.
सध्या जगभरात खेळवल्या जाणाऱ्या विविध क्रिकेट लीग्जचे नियम भिन्न आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने जुलै महिन्यात एका 'रिव्ह्यू ग्रुप'ची (समीक्षा समिती) स्थापना केली होती. या समितीने फ्रँचायझी लीग्जचा सविस्तर अभ्यास करून आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर काही महत्त्वाच्या शिफारशी सादर केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंतिम अकरा (प्लेइंग इलेव्हन) मधील परदेशी खेळाडूंची संख्या निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.
परदेशी खेळाडूंच्या मर्यादेसह इतरही काही कठोर शिफारशी या प्रस्तावात आहेत. लीग्जला मान्यता देताना आयसीसीचे अधिकार वाढवून त्याचे ऑडिट करणे, सट्टेबाजी (बेटिंग) किंवा त्यासंबंधित कंपन्यांच्या प्रायोजकत्वावर बंदी आणणे आणि लीगला मान्यता देण्यासाठी विशिष्ट शुल्क आकारणे या मुद्द्यांचाही यात समावेश आहे.
आयपीएल (IPL) आणि बिग बॅश लीग (BBL) सारख्या स्पर्धांमध्ये ठराविक परदेशी खेळाडूंनाच खेळवण्याची मुभा असते, ज्यामुळे स्थानिक खेळाडूंना संधी मिळते आणि व्यवसायाचाही विस्तार होतो. याउलट, एमएलसी आणि आयएलटी२० या स्पर्धा पूर्णपणे परदेशी स्टार खेळाडूंवरच अवलंबून आहेत. सध्या आयएलटी२० मध्ये एका असोसिएट सदस्यासह तब्बल ९ परदेशी खेळाडूंना, तर एमएलसीमध्ये ६ परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याची परवानगी आहे.
अमेरिका आणि यूएईच्या राष्ट्रीय संघांमध्ये फारसे स्टार खेळाडू नसल्याने, या फ्रँचायझी लीग्जची मोठी आर्थिक उलाढाल केवळ परदेशी खेळाडूंच्याच जिवावर होते. त्यामुळे बाली येथील बैठकीत या नव्या नियमांना मार्गदर्शक तत्त्वे म्हणून मंजुरी मिळाल्यास, या लीग्जना नाईलाजाने स्थानिक खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. अशा परिस्थितीत या लीग्जचे मालक आणि गुंतवणूकदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाबाबत ऋतुराज गायकवाडला एस बद्रीनाथचा थेट इशारा
- आकाश चोप्राने निवडली चौथ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन; ईशान किशन, ऋतुराजबाबत सुचवला मोठा बदल
- आता सर्व संपलं… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम




