प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) विद्यमान कर्णधार ऋतुराज गायकवाड याला माजी भारतीय खेळाडू एस. बद्रीनाथ याने आयपीएल २०२७ पूर्वी थेट इशारा दिला आहे. आगामी हंगामात गायकवाडने प्रभावी कामगिरी न केल्यास, सीएसकेचा कर्णधार म्हणून हा त्याचा अखेरचा हंगाम ठरू शकतो, अशी भविष्यवाणी बद्रीनाथने केली आहे.
एमएस धोनीचा उत्तराधिकारी म्हणून संघ व्यवस्थापनाने गायकवाडकडे नेतृत्व सोपवले होते. सुरुवातीला धोनीची मैदानावर साथ मिळूनही, एक नेता आणि वैयक्तिक खेळाडू म्हणून तो अद्याप स्वतःला पूर्णपणे सिद्ध करू शकलेला नाही. आकडेवारीनुसार, ऋतुराजच्या नेतृत्वाखालील ३३ पैकी केवळ १४ सामन्यांत चेन्नईला विजय मिळाला असून १९ वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्याची ४२.४२ टक्के विजयाची आकडेवारी फ्रँचायझीच्या परंपरेशी साजेशी नाही. मागील हंगामात संजू सॅमसनसारखा अव्वल दर्जाचा फलंदाज संघात असूनही पाच वेळच्या विजेत्या चेन्नईला गुणतालिकेत आठवे स्थान मिळाले होते.
आयपीएल २०२७ च्या निमित्ताने सीएसके एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. जुने मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची जागा आता झहीर खानने घेतली आहे. बद्रीनाथने आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्पष्ट केले की, अलीकडच्या काळात संघातील बदलांमध्ये गायकवाडचा फारसा सहभाग नसावा. तो म्हणाला, "ऋतुराज निश्चितपणे कर्णधार म्हणून कायम राहील. पण गेले वर्षभर संघ निवडण्यात त्याचा फारसा सहभाग राहिलेला नाही. त्यामुळे कदाचित ते त्याला आणखी एक वर्ष देतील आणि त्यानंतर निर्णय घेतील. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात चांगले संबंध आहेत की नाही हे त्यांना पाहायचे असेल, कारण झहीरही पश्चिमेकडून आला आहे."
झहीर आणि ऋतुराज या दोघांची जोडी अपयशी ठरल्यास, नेतृत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशा संधी मिळाल्यामुळे व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते, असे बद्रीनाथने स्पष्ट केले. तसेच हा आगामी हंगाम केवळ गायकवाडसाठीच नाही, तर शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांसारख्या खेळाडूंसाठीही अत्यंत महत्त्वाचा असेल. बद्रीनाथ पुढे म्हणाला, "हे वर्ष अनेकांसाठी परीक्षेचे असेल. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि संजू सॅमसनसाठीही हे वर्ष महत्त्वाचे असणार आहे. त्यांना कामगिरी सुधारावी लागेल. ते वरिष्ठ खेळाडू आहेत. चारपैकी एका सामन्यात कामगिरी केली आणि तरीही वरिष्ठ खेळाडू म्हणून राहिले, असे चालणार नाही. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. सीएसकेच्या सर्व वरिष्ठ खेळाडूंसाठी ही मोठी परीक्षा असेल."
📌 महत्त्वाच्या बातम्या
- आकाश चोप्राने निवडली चौथ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन; ईशान किशन, ऋतुराजबाबत सुचवला मोठा बदल
- आता सर्व संपलं… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम
- दिवाळीच्या फराळानंतर गॅस आणि ॲसिडिटी वाढलीये? पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय




