‘आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा’; पीजी प्रवेश न मिळाल्याने KEM मधून MBBS झालेल्या २५ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

वैद्यकीय पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत प्रवेश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून केईएममधून एमबीबीएस पूर्ण केलेल्या २५ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली आहे.

mahasatta

शिरपूर, 14 नोव्हेंबर: वैद्यकीय पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत प्रवेश न मिळाल्याच्या नैराश्यातून मुंबईतील केईएम रुग्णालयातून (KEM Hospital) एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या २५ वर्षीय तरुण डॉक्टरने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे घडली आहे. डॉ. आयुष चंद्रकांत पवार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे.

डॉ. आयुषने ११ नोव्हेंबर रोजी रात्री शिरपूरमधील विद्या विहार कॉलनी येथील राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. तो पहिल्या मजल्यावर भावासोबत झोपला होता. त्यानंतर १२ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. आत्महत्येपूर्वी त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने, “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका. माझे कुटुंबीय आणि मित्रांचा मी आभारी आहे. मी माझ्या जीवनात अयशस्वी झालोय. आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा,” असे लिहीत शेवटी आपली सही केली आहे.

डॉ. आयुष हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने एमबीबीएसच्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर मुंबईतील केईएमसारख्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत त्याला १३०० वी रँक मिळाली होती. मात्र, पहिल्या फेरीत प्रवेश न मिळाल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता, असे समोर आले आहे.

आयुषचे वडील चंद्रकांत मुलचंद पवार हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर आई मनीषा एकनाथ पाटील या आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आयुष हा या दाम्पत्याचा लहान मुलगा होता. एका अत्यंत हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याने अशाप्रकारे अकाली मृत्यूला कवटाळल्याने शिरपूर शहरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या