अधिकार क्षेत्राबाहेर कारवाई भोवली; एफडीएच्या आणखी ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन धाड टाकल्याने एफडीएच्या २६ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आणखी ६ जणांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

mahasatta

मुंबई, 31 ऑक्टोबर: अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कारवाई करणे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागातील २६ अधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे. या प्रकरणात आणखी ६ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तसेच, इतर २० अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे आणि भिवंडी येथील एका तंबाखू कंपनीवर धाड टाकली होती. ही कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याची पूर्वकल्पना असतानाही अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे ही कारवाई केली. त्यानंतर हे प्रकरण थेट न्यायालयापासून दिल्लीपर्यंत पोहोचले आणि आता या बेकायदा कारवाईमुळे अधिकाऱ्यांवरच कारवाईची वेळ आली आहे.

या कारवाईबाबतची फाईल एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असून, आज दुपारपर्यंत या ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे अधिकृत आदेश निघण्याची शक्यता आहे. यासोबतच २० अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही मंत्री कार्यालयातून निघू शकतात.

कारवाईच्या फेऱ्यात अडकलेले हे सर्व वरिष्ठ अधिकारी मुंबई आणि पुण्यातील आहेत. यामध्ये मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात यापूर्वीच ६ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या सुपारी प्रकरणातही एफडीएच्या सुमारे ५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

एकाच वेळी तब्बल २६ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेल्याने हे एफडीएच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण मानले जात आहे. या मोठ्या कारवाईमुळे आयुक्त तुकाराम मुंडे आणि मंत्री झिरवळ हे विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पूर्णपणे 'ॲक्शन मोड'मध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या