सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची करडी नजर; तुकाराम मुंढेंचा इशारा, १९ कोटींचे मसाले जप्त

दिवाळीत शुद्ध अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा भेसळखोरांना इशारा; राज्यभरातून तब्बल १९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त मसाले जप्त.

mahasatta

वांद्रे, 29 ऑक्टोबर: दिवाळीच्या सणासुदीत नागरिकांना शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग आक्रमक झाला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वांद्रे येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी कारवाईचा वेग आणखी वाढवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून कारवाईचा धडका लावला आहे. सण जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएने नुकतीच तब्बल १०५७ मसाला उत्पादक आस्थापनांची कसून तपासणी केली. या मोठ्या कारवाईत जवळपास १९.६९ कोटी रुपये किमतीचे तब्बल ११,९६३ क्विंटल मसाले आणि मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ५५७ जणांना सुधारणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत प्रामुख्याने कारखाने आणि गोदामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मात्र, यापुढे किरकोळ विक्रेते, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांचीही कसून तपासणी केली जाईल, अशी माहिती मुंढे यांनी दिली.

दिवाळीच्या काळात फराळ, मिठाई, चकली, चिवडा आदी खाद्यपदार्थांची विशेष चौकशी केली जाणार आहे. खाद्यतेलाबाबतही लवकरच माहिती दिली जाणार असून ही मोहीम दिवाळी संपेपर्यंत सुरू राहील. मुदत संपलेले आणि निकृष्ट अन्नपदार्थ खाल्ल्याने सणासुदीत नागरिकांच्या आजारांचे प्रमाण वाढते, याकडे लक्ष वेधत सुरक्षित अन्नासाठी प्रशासनाने विशेष आदेश काढल्याचे मुंढे यांनी सांगितले.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या