वारंवार वापरलेले तेल, अस्वच्छ फ्रीज अन् खराब अन्न; मुंबईत FDA ची थेट कारवाई, तुकाराम मुंढेंचा दणका

मुंबईत एफडीएने अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डॉमिनोज पिझ्झाच्या तीन शाखांसह १७ हॉटेल्स तसेच तीन रक्तकेंद्रांवर निलंबनाची धडक कारवाई केली आहे.

mahasatta

मुंबई, 15 ऑक्टोबर: राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईसह राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. मुंबईतील तब्बल १७ हॉटेल्सवर नुकतीच कारवाई करण्यात आली असून, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बड्या संस्थांनाही एफडीएने मोठा दणका दिला आहे.

या मोहिमेअंतर्गत ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या मालकीच्या 'डॉमिनोज पिझ्झा'च्या परळ, बोरीवली आणि अंधेरी पूर्व येथील तीन प्रमुख शाखांवर कारवाई झाली आहे. अचानक केलेल्या तपासणीत पिझ्झा बनवण्याच्या आणि साठवणुकीच्या जागेत मोठी अस्वच्छता आढळली. ग्राहकांना खराब अन्न देणे, वारंवार तेच तेल वापरणे आणि फ्रीजमध्येही अस्वच्छता असणे अशा गंभीर त्रुटी समोर आल्याने या तिन्ही शाखांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, धारावीतील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने त्यांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. या कारवाईबाबत हॉटेल चालकाला विचारले असता त्याने बोलण्यास नकार दिला.

अन्नपदार्थांसोबतच आरोग्य क्षेत्रातही एफडीएने कडक पावले उचलली आहेत. ऐच्छिक रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रलोभन म्हणून 'टायटन' घड्याळे वाटल्याप्रकरणी मुंबईतील तीन रक्तकेंद्रांवर निलंबनाची कारवाई झाली. नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन कौन्सिलच्या (NBTC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा प्रकारे भेटवस्तू देण्यास सक्त मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर, कारणे दाखवा नोटीस बजावून आणि सुनावणी घेऊन कारवाई करण्यात आली.

यामध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या रक्तकेंद्राचा परवाना ५ दिवसांसाठी, तर जे. जे. आणि बी. वाय. एल. नायर रुग्णालयाच्या रक्तकेंद्रांचे परवाने ३ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, जे. जे. आणि नायर रुग्णालयांच्या रक्तकेंद्रांनी शासनाकडे अपील केल्याने त्यांच्या निलंबन आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या