छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर: एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देणारे एक पत्र त्यांच्या कार्यालयात सापडले आहे. 'तुम्हाला कोणत्याही क्षणी मारले जाऊ शकते', असा गंभीर इशारा या पत्रातून देण्यात आला आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.
या धमकीच्या पत्रात अत्यंत धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. जलील यांची हत्या करण्यासाठी अहिल्यानगर येथील एका तरुणाला सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे. तसेच, संबंधित तरुणाचे नाव आणि त्याचा सविस्तर पत्ताही या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे पत्र मिळताच इम्तियाज जलील यांनी ते तत्काळ पोलिसांच्या हवाली केले. पत्रात केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून अहिल्यानगरमधील त्या व्यक्तीची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार पोलीस या पत्रामागचे नेमके कारण, माहितीची सत्यता आणि त्या तरुणाचा याच्याशी खरंच काही संबंध आहे का, याचा शोध घेत आहेत.
या धमकीबाबत बोलताना जलील यांनी स्पष्ट केले की, याआधीही आपल्याला अनेकदा अशा धमक्या आल्या असून आपण त्यांना भीक घालत नाही. मात्र, त्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र चिंता व्यक्त केली. शहरात गावठी कट्टे आणि बंदुका खुलेआम येत असून, भररस्त्यात हत्या होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप त्यांनी केला.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मधून वैभव सूर्यवंशीला वगळण्याच्या निर्णयाचे स्टीफन फ्लेमिंगकडून समर्थन
- गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा: ‘एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री नाहीत, ते तर संकरित राजकारणी’
- निवडणुका नसताना एवढी घाई का? सर्वोच्च न्यायालयाच्या विचारणेनंतर ६ राज्यांचे ‘SIR’ वेळापत्रक बदलले




