प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नवनाथ बन यांनी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर अतिशय तिखट शब्दांत टीका केली आहे. धंगेकरांना 'बारा पक्ष फिरलेला माकडछाप' असे म्हणत बन यांनी शुक्रवारी त्यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल केला.
विधानपरिषदेतील भाजपच्या पराभवाला धंगेकरांची भूमिका कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करत बन यांनी याआधीच्या दिवशी शिंदे गटाला लक्ष्य केले होते. या निकालानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रात बन यांनी पुन्हा धंगेकरांवर निशाणा साधला. एका पक्षात करिअर न जमल्याने १२ पक्ष फिरून शिवसेनेत आलेली ही व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि आपल्यावर खालच्या पातळीवर टीका करत असल्याचे ते म्हणाले.
पुणेकर आणि विधानसभेने या 'माकडछाप ब्रँड'च्या व्यक्तीला घरी बसवले आहे, अशी बोचरी टीका नवनाथ बन यांनी केली. पुणे महापालिका निवडणुकीत धंगेकरांच्या मुलासह कुटुंबातील दोघांचे डिपॉझिट जप्त झाले होते, याची आठवण करून देत त्यांनी भाजपला शहाणपण शिकवू नये, असे ते म्हणाले. माकडाच्या हाती कोलीत अशी त्यांची अवस्था असून, बारा घरी धुणीभांडी करूनही ते आपले करिअर सेट करू शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
धंगेकरांच्या राजकीय प्रवासावर बोट ठेवताना बन म्हणाले की, काँग्रेस, मनसे आणि शिवसेना असा प्रवास करणारे उद्या उबाठामध्येही जातील. त्यांच्या मागे पंजा, रेल्वे इंजिन, धनुष्यबाण होते आणि उद्या शिटी येईल. कोणत्याही पक्षात त्यांना कुणी किंमत दिली नसल्याचे सांगत नवनाथ बन यांनी त्यांना एकेरी शब्दांत सुनावले.
स्वतःच्या वाटचालीबाबत बोलताना बन यांनी स्पष्ट केले की, आपण १२ वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे काम केले, त्यानंतर पत्रकारिता केली आणि आता हाती भाजपचे कमळ आहे. करिअर सेट न झाल्यानेच धंगेकर माकडासारख्या उड्या मारत असून अशा व्यक्तीकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- अधिकार क्षेत्राबाहेर कारवाई भोवली; एफडीएच्या आणखी ६ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
- रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार; हार्दिक पांड्याची जागा घेणार, २०२६ मध्येच बदलू इच्छित होती फ्रँचायझी
- माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; कार्यालयात सापडलेल्या पत्रात हत्येच्या सुपारीचा उल्लेख




