पुणे शिक्षक निवडणुकीवरून शिवसेना-भाजपमध्ये तणाव; शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचे महायुतीला घरचा आहेर देणारे वक्तव्य

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले गेले असून शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

mahasatta

पुणे, 15 ऑक्टोबर: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुण्यात स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत देत दबावाचे राजकारण सुरू केले आहे. याच दरम्यान, पुण्यात शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी देशातील सद्यस्थितीवर बोट ठेवत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. "देशात परिस्थिती चांगली वाटत नाही," असे थेट विधान त्यांनी केले आहे.

या निवडणुकीत शिंदेसेनेने सुरुवातीला मंगेश चिवटे यांना अधिकृतपणे एबी फॉर्म दिला होता, मात्र नंतर त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. या घडामोडीनंतर शिवसेना भाजप उमेदवाराचे समर्थन करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र काल रात्री उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली, ज्यामध्ये अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मंगेश चिवटे यांच्या माघारीबाबत विचारले असता रवींद्र धंगेकर म्हणाले, "राजकारणात काही आराखडे असतात. काही वर-खाली दिसत असतं. पक्षाने त्यांचा निर्णय घेतला. आज अंतिम निर्णय होईल. उद्या नाही." तसेच सचिन सानप यांना पाठिंबा देण्यावर भाष्य करताना ते म्हणाले, "सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबद्दल अजून काही अंतिम निर्णय झालेला नाही. मी पक्षाचा प्रमुख नाही. शिंदे साहेब निर्णय घेतील. साधक-बाधक चर्चा झाली आहे."

सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आणि परिस्थितीवर बोलताना धंगेकर पुढे म्हणाले, "ग्राऊंडवर, लोकांमध्ये काय चर्चा आहे त्यावर चर्चा झाली. देशात परिस्थिती चांगली वाटत नाही. देशामधलं चित्र बदलत चाललं आहे. कचऱ्याचं टेंडर, पाण्याचं टेंडर यावर चर्चा होते. जनतेची कामं सोडून टेंडरची काम चालू आहेत. त्यामुळे 100 नगरसेवकांचा स्वाभिमान दुखावला असेल."

पक्षीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले, "सचिन सानप यांना पाठिंबा देण्याची घोषणा झालेली नाही. कालची आढावा बैठक होती. आमदार, खासदार, नगरसेवक यांची चर्चा झाली. कशापद्धतीने ही निवडणूक लढवली पाहिजे. यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. आज अंतिम निर्णय होईल. शिंदेसाहेब छुपा वैगेर पाठिंबा देत नाहीत. जे काय असेल ते खुल्लम खुल्ला होईल, ओपन होईल. होय किंवा नाही."

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या