प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींवर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत भाजपला थेट सुनावले आहे. २०१९ नंतर आम्ही जर उठाव केला नसता, तर भाजपला राज्यात सत्ता मिळाली नसती, असे रोखठोक विधान शिरसाट यांनी केले आहे.
ठाकरे बंधू आणि फडणवीस एकत्र आले म्हणजे लगेचच नवी राजकीय समीकरणे तयार होतील, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे शिरसाट म्हणाले. नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेतच असतात. यापेक्षा आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली आहे का, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी शिरसाट यांनी नवनाथ बन यांच्यावरही जोरदार टीका केली. बन यांनी स्वतःची पातळी ओळखून विधाने करावीत, अन्यथा त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांची सहमती आहे का, असा प्रश्न आम्हीही विचारू शकतो, असा इशारा शिरसाट यांनी दिला. तसेच, आगामी तीन महिन्यांत राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील, असेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सध्या बरीच चर्चा सुरू असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले. शिंदे हे एक 'कॉमन मॅन' असून पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यात कोणालाही यश येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आमच्यामध्ये कोणतीही धुसफूस नसून सर्व काही आलबेल असल्याचा दावा मंत्री शिरसाट यांनी केला आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या शतकी खेळीचे ग्लेन फिलिप्सने दिले आयपीएलला श्रेय
- राज आणि उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय बैठक नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
- युवराज सिंगची बीसीसीआयकडे मोठी मागणी; अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीला वनडेत संधी देण्याचा आग्रह




