प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला 'मासूम' हा चित्रपट सुरुवातीच्या अपयशानंतर प्रचंड हिट ठरलेल्या बॉलिवूडमधील मोजक्या कलाकृतींपैकी एक मानला जातो. अभिनेत्री शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला पहिल्या सहा दिवसांत प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. मात्र, सातव्या दिवशी अचानक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांचा 'मासूम' हा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट होता. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या अनुभवाच्या आठवणी सांगितल्या आहेत. चित्रपटाकडून त्यांना सुरुवातीपासूनच चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा होती; परंतु प्रदर्शनानंतर पहिले सहा दिवस थिएटर पूर्णपणे रिकामे होते. पहिल्या दिवशीही प्रेक्षक फिरकले नाहीत आणि जवळपास आठवडाभर हीच परिस्थिती राहिल्याने वितरकांनी चित्रपट काढून टाकण्याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली होती.
मात्र, सातव्या दिवसापासून चित्रपटाचे चित्र पालटले. अचानक प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली आणि दुसऱ्या वीकेंडला तर चित्रपटाचे शो चक्क हाऊसफुल्ल होऊ लागले. कौटुंबिक भावनांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने, त्यातील हृदयस्पर्शी कथा आणि संगीताच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीला अपयशी वाटणारा हा चित्रपट नंतर हिंदी सिनेसृष्टीतील एक संस्मरणीय कलाकृती ठरला.
या चित्रपटातील शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रभावी अभिनयाची विशेष प्रशंसा झाली. 'मासूम'च्या यशाने शेखर कपूर यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीलाही एक भक्कम सुरुवात मिळवून दिली. याच टप्प्यानंतर पुढे त्यांनी 'मिस्टर इंडिया' आणि 'बँडिट क्वीन' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.





