दिल्ली, 14 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, आता दिल्लीत 'लेहरा दो तिरंगा' मार्च काढण्यात येणार आहे. या घोषणेमुळे दिल्लीतील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सध्या आंदोलनासाठी बंदी असून परिसरात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. असे असतानाही कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे हे आपल्या काही मित्रांसह या भागात पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
यापूर्वीही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी पक्षाने दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी झालेल्या गोंधळात पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. आता सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना झालेल्या ताज्या अटकेच्या निषेधार्थ अभिजीत दिपके यांनी नव्याने आंदोलनाची हाक दिली आहे.
नेत्यांच्या अटकेला विरोध दर्शवण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कनॉट प्लेस परिसरातून 'लेहरा दो तिरंगा' मार्चला सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजीत दिपके यांच्याकडून करण्यात आले आहे.





