प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना मधू कांबीकर यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं. गेल्या दहा वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या निधनानंतर आता त्यांची भाची कीर्ती वैरालकर हिने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या शेवटच्या इच्छेचा खुलासा केला आहे.
मधू कांबीकर गेली अनेक वर्षे आजारी होत्या. त्या कोणालाही ओळखत नव्हत्या, मात्र घुंगरांचा आवाज ऐकला की त्यांच्या हातांची हालचाल व्हायची. कीर्ती यांनी आपल्या पोस्टमध्ये घुंगरांचे फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'माझ्या सोबत माझे घुंगरू न विसरता द्याल', ही मधू मावशीची शेवटची इच्छा होती, असे कीर्तीने म्हटले आहे.
या पोस्टमध्ये कीर्तीने एका खास फोटोचा उल्लेख केला आहे. मधू कांबीकर यांच्या रूममध्ये ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातील मंचावर त्यांच्या पायात घुंगरू बांधलेला एक मोठा फोटो फ्रेम करून लावलेला आहे. मधू यांचा मुलगा प्रीतम याने जेव्हा ते घुंगरू कीर्ती यांच्या हातात दिले, तेव्हा त्यांना रडू कोसळले. वडिलांच्या कुशीत शिरून रडल्यानंतर कीर्ती यांनी रूममधील त्याच मोठ्या फोटोसमोर सोबत जाणाऱ्या घुंगरांचा फोटो काढल्याचे सांगितले.
विजेसारखी तळपणारी कलावंत अशी पडून असलेली पाहून काळजाला पीळ पडायचा, पण आज मावशी त्या त्रासातून कायमची मुक्त झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ज्या कलेने कांबीकर यांना महाराष्ट्र, भारत आणि जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली, त्या कलेशी त्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहिल्याचे कीर्तीने आवर्जून नमूद केले.
मधू कांबीकर यांच्या यशाची साक्ष देणारे अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि मानपत्रे त्यांच्या खोलीत आहेत. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांच्यासोबत या बिजलीने फुगडी खेळल्याची विशेष आठवणही कीर्ती यांनी या पोस्टमध्ये शेअर केली आहे. त्यांच्या कुटुंबाचे आणि कांबीकर यांचे रक्ताच्या नात्यापलीकडचे स्नेह होते. कीर्ती यांच्या जन्मापूर्वीपासून त्यांच्या वडिलांची आणि मधू यांची ओळख होती. वडिलांनीही याच आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
"आज दिवसभर भेटीला आलेला सगळा गोतावळा सोडून तू अनंताच्या प्रवासाला निघून गेलीस. प्रचंड देखणं रूप आणि नृत्याची कमालीची जाणकार असलेली साक्षात हिरोईन आज स्वर्गात गेलीये. आता स्वर्गात रंभा आणि उर्वशीला तू जबरदस्त कॉम्प्लेक्स देणार," अशा शब्दांत कीर्ती यांनी 'भावपुर्ण श्रद्धांजली मधू मावशी…तुझीच कीर्ती' असे लिहीत आपल्या लाडक्या मावशीला अखेरचा निरोप दिला आहे.





