‘डावी कंबर दिसली तर सज्जन, उजवी दिसली तर…’ साडीवरून ट्रोल झालेल्या ऊर्मिला निंबाळकरचे सडेतोड उत्तर

साडी नेसण्याच्या पद्धतीवरून अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरला सोशल मीडियावर भयंकर ट्रोलिंग आणि धमक्यांचा सामना करावा लागला. यावर तिने व्हिडीओद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: 'पुरुषांवर बोलू काही' या लाइव्ह शोदरम्यान वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्यामुळे अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर ऊर्मिला निंबाळकरला सोशल मीडियावर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. साडी नेसण्याच्या पद्धतीवरून तिला सामूहिक बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि चक्क जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या सर्व प्रकारानंतर ऊर्मिलाने एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे.

या कार्यक्रमात ऊर्मिलाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि अगदी खासगी मेसेजमधूनही तिला अत्यंत आक्षेपार्ह प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका महिलेने तर 'तू सेक्स वर्कर झाली आहेस का?' अशी खालच्या पातळीवरची कमेंट केली. या वाढत्या ट्रोलिंगमुळे तिला अखेर संबंधित रील आणि पोस्ट आर्काइव्ह करावी लागल्याचे तिने सांगितले.

या संपूर्ण प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना ऊर्मिलाने सांगितले की, भारतात साडी नेसण्याच्या शंभरहून अधिक पद्धती आहेत आणि प्रत्येक शैलीचा एक सांस्कृतिक इतिहास आहे. साडी नेसवण्याचे प्रशिक्षण आणि अभिनयाच्या अनुभवामुळे तिला अनेक पद्धती माहिती आहेत. मात्र, शोमध्ये नेसलेल्या गुलाबी साडीचा घेर आणि आकार वेगळा असल्याने ती नेहमीच्या पद्धतीने व्यवस्थित नेसणे शक्य नव्हते, असे स्पष्टीकरण तिने दिले.

कपड्यांवरून महिलांचे चारित्र्य ठरवणाऱ्या मानसिकतेवर तिने कडाडून टीका केली. साडीची डावी कंबर दिसली तर ती संस्कृती जपणारी आणि उजवी कंबर दिसली तर ती चुकीची, असा दुटप्पी दृष्टिकोन का बाळगला जातो, असा थेट सवाल तिने उपस्थित केला. इतके सगळे होऊनही आपल्या शोला आणि उपक्रमाला महिलांकडून मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून आपण आनंदी असल्याचे ऊर्मिलाने म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या