प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) चर्चेनंतर आता इन्स्टाग्रामवर 'मक्खी जनता पार्टी' (MJP) या नव्या नावाची जोरदार हवा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका सूचक विधानानंतर या नव्या पेजचा उदय झाला असून, अवघ्या ७२ तासांत या पेजला ३ लाख ३० हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. जेनझी (GenZ) पिढीकडून या ट्रेंडला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे, हा नवा पक्ष अभिजीत दीपके यांच्यासाठी पर्याय असणार की त्यांना पूरक ठरणार, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.
१० ऑक्टोबर रोजी दिल्लीत सीजेपीचे आंदोलन होणार होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रस्ते, रेल्वे आणि मेट्रो बंद करत ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. या प्रकरणाच्या याचिकेवर ९ ऑक्टोबरला सुनावणी घेताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. 'नागरिकांची सुरक्षा करणे हे सरकारचे काम असले तरी, लोकांना त्रास होईल असे निर्णय घेऊ नयेत. माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका,' अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती.
न्यायालयाच्या याच टिप्पणीचा आधार घेत 'मक्खी जनता पार्टी' अस्तित्वात आली. 'आता तर माशीही म्हणले, आम्ही कुणापेक्षा कमी नाही,' अशी प्रतिक्रिया देत एमजेपीने आपली भूमिका मांडली आहे. या पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजवरील व्हिडिओंना मागील ७२ तासांत ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अकाऊंट जून २०२१ मध्ये तयार करण्यात आले होते. आता त्याचे नाव ‘makhijantaparty.ig’ असे ठेवण्यात आले असून, यापूर्वी तब्बल आठ वेळा या पेजचे नाव बदलले गेल्याचे समोर आले आहे.
या 'मक्खी जनता पार्टी'चा संस्थापक म्हणून 'आर्यन' नावाच्या एका विद्यार्थ्याचे नाव चर्चेत आले आहे. सध्या या संघटनेच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून अधिकृत प्रवक्त्याचा शोध घेतला जात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हा आर्यन नक्की कोण आहे, तो कोणत्या राज्याचा रहिवासी आहे आणि त्याची राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आर्यनच्या या नव्या पक्षामुळे राजकारणात कोणती भूमिका निभावली जाणार आणि तो अभिजीत दीपकेंना कशाप्रकारे पूरक किंवा पर्यायी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





