प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचलेल्या 'कॉकरोच जनता पक्षा'च्या (सीजेपी) तीन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईवर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, तिरंगा फडकवणे हा गुन्हा कधीपासून झाला, असा थेट सवाल त्यांनी दिल्ली पोलिसांना विचारला आहे.
मंगळवारी कडेकोट सुरक्षा आणि बॅरिकेडिंग असलेल्या जंतर-मंतर परिसरात सीजेपीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका पोहोचले होते. तिथे राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पक्षाचे आणखी एक सदस्य अजिंक्य शिंदे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दीपके यांनी दिली. या अटकेला त्यांनी 'अपहरण' म्हटले असून, वकिलांनाही ताब्यात असलेल्या सदस्यांना भेटू दिले जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
राष्ट्रध्वज फडकवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे असे ज्यांना वाटते, ते देशद्रोही आहेत, असे सांगत या कारवाईविरोधात सीजेपीची कायदेशीर टीम न्यायालयात दाद मागणार असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी वकिलांना रोखल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. जंतर-मंतरवर निदर्शनांना बंदी घातल्यास संपूर्ण देशच जंतर-मंतर बनेल आणि देशभरात आंदोलने सुरूच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
बुधवारी आपण स्वतः आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचणार असून, वाटेत पोलिसांनी अडवल्यास तिथेच आंदोलन सुरू करू, असा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला आहे. उद्या पक्षाच्या राष्ट्रीय समितीची बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशात एका विचारधारेवर सरकार चालणार नसून, हा देश संविधानानुसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरच चालेल, असेही ते म्हणाले.
यावेळी दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली. सरकार 'फोडा आणि राज्य करा' या नीतीचा अवलंब करत असून, यासाठी नागरिकांना मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल, असे ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मोदी आणि शाह यांच्या आदेशांवर काम करत असून, निवडणुकांपूर्वीच अमित शाह विजयाचे दावे कसे काय करू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ज्ञानेश कुमार यांच्यासाठी सरकारने दिल्ली ठप्प केल्याचा आरोप करत, लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन दीपके यांनी केले. तसेच, 'इम्रान खान भारतीय नाहीत, मग जयशंकर यांची मुले कुठे भारतीय आहेत?' असा दाखला देत त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.





